Monday, March 10, 2008

गावकल्याणाचा वसा!

शेती हा कोणत्याही गावाच्या अर्थकारणाचा कणा असतो. गावातील शेती समृद्ध असावी, त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे म्हणून अनेक ग्रामपंचायती चांगले काम करत असतातच; पण त्याही पलीकडे जाऊन गावातील मुलांचे शिक्षण, महिला सबलीकरण, वैद्यकीय सेवांबाबत सतर्कता, दळणवळण या सर्व गोष्टींकडे ग्रामपंचायतीने लक्ष दिल्यास गावाचा चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो.

ग्रामपंचायत अधिनियमांमध्येही त्या संदर्भात काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामध्ये समाजकल्याण, शिक्षण, वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य इ. गोष्टींचाही समावेश होतो. गावातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळतो आहे का, गरिबातल्या गरीब व्यक्तीलाही वैद्यकीय सुविधा मिळत आहेत का, हे पाहण्याचे व त्यानुसार नियोजन करण्याचे काम ग्रामपंचायतीचे असते.

समाजकल्याण

1. गावात अपंग, निराश्रित व आजारी व्यक्ती असतात. अशा व्यक्तींना मदतीची गरज भासते. त्यांना गरज पडल्यास साह्य देण्याचे काम ग्रामपंचायत करते.

2. गावाचे सामाजिक व नैतिक कल्याण लक्षात घेणे. गावात एखादा दारूचा गुत्ता उभा राहतो आणि ते गाव बरबादीच्या दिशेने जाऊ लागते, अशा वेळी त्याची दखल ग्रामपंचायतीने वेळीच घेणे गरजेचे असते. यामध्ये दारूबंदीला उत्तेजन, अस्पृश्‍यता निवारण, मागासवर्गाची स्थिती सुधारणे, भ्रष्टाचार निर्मूलन करणे, जुगाराला व कायदेविषयक निरर्थक वादाला आळा घालणे या बाबींचा समावेश होतो.

गावातील महिलांचे सबलीकरण करण्यासाठी काही उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवण्यात येतात. त्यासाठी महिलांच्या व मुलांच्या संघटना तयार करून त्या माध्यमातून त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देणे असो, वा महिलांना गावासंदर्भातील निर्णयप्रक्रियेत सामावून घेणे असो, त्यासंदर्भात ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे अपेक्षित असते. याबरोबरच गावाचे आरोग्य चांगले राहावे म्हणून काही उपक्रम ग्रामपंचायतीला राबवावे लागतात.

वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य
1. वैद्यकीय साह्याची तरतूद करणे.
2. सुरक्षित प्रसूती व शिशुकल्याणासाठी योग्य यंत्रणा उभी करणे.
3. सार्वजनिक आरोग्य रक्षण व सुधारणेसाठी प्रयत्न करणे.
4. कोणत्याही साथीच्या किंवा इतर रोगांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजणे.
5. माणसांना आणि प्राण्यांना लस टोचण्यासाठी उत्तेजन देणे.
6. चहा, कॉफी व दुधाच्या दुकानांचे लायसेन्सद्वारे विनियमन करणे.
7. कत्तलखाने बांधणे, ते सुस्थितीत ठेवणे व त्यांवर नियंत्रण ठेवणे.
8. सार्वजनिक रस्ते, नाले, बांध, तलाव, विहिरी आणि इतर सार्वजनिक जागा स्वच्छ करणे.
9. रोगट वस्त्यांची सुधारणा करणे. 10. कचऱ्याचे ढीग, माजलेले रान, काटेरी निवडुंग काढून टाकणे.
11. वापरात नसलेल्या विहिरी, अपायकारक तळी, डबकी, खंदक, खड्डे किंवा खाच-खळगे बुजविणे. पाटबंधाऱ्यांच्या क्षेत्रात पाणी साचण्यास प्रतिबंध करणे.
12. सार्वजनिक शौचालये बांधणे व ती स्वच्छ ठेवणे.
13. गावात सार्वजनिक स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करणे.
14. गुरांना पाणीपुरवठा करण्यासाठी तळी बांधणे, ती स्वच्छ करणे व सुस्थितीत राखणे. 15. मेलेल्या जनावरांची योग्य विल्हेवाट लावणे.
16. ज्यांचे कोणत्याही प्राधिकरणाकडून व्यवस्थापन होत नसेल, अशा स्नानाच्या किंवा धुण्याच्या घाटांचे व्यवस्थापन करणे, त्यांवर नियंत्रण ठेवणे.
17. दहनभूमी किंवा दफनभूमींची तरतूद करणे, त्या सुस्थितीत राखणे.

शिक्षण
1. शिक्षणाचा प्रसार करणे.
2. शाळांकरिता शैक्षणिक सुविधा पुरवणे.
3. गावात प्रौढ शिक्षण वर्ग चालवणे, तसेच ग्रंथालये आणि वाचनालयांची सोय करणे.
4. ग्रामीण विमा संरक्षणाबाबत लोकांमध्ये जाणीव-जागृती करणे. कोणत्याही चांगल्या गावाची ग्रामपंचायतदेखील कार्यक्षम असते आणि त्यामध्ये काम करणारी माणसे सक्षम असली, तर खरोखरच सर्वार्थाने गावात सुधारणा होऊ शकते.

0 comments: