Monday, March 10, 2008

असे ठेवावे बांधकामावर नियंत्रण!

गावात एकोपा असावा, गाव सुरक्षित असावे, याबाबतीत ग्रामपंचायत ही जितकी प्रयत्नशील असते, त्याचबरोबर गावातील सुव्यवस्थेबाबतही ती तितकीच जागरूक असते.

गावातील नवी आणि जुनी बांधकामे ही ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे त्यासंदर्भातील कोणत्याही घडामोडींसाठी ग्रामपंचायतीकडे विचारणा करावी लागते, अर्ज करावा लागतो. गावात नवीन इमारत बांधायची असेल, तर ग्रामपंचायतीची परवानगी घ्यावी लागते.

गावात इमारती उभारण्यावर ग्रामपंचायतीचे नियंत्रण असते. कोणतीही व्यक्ती पंचायतीच्या पूर्वपरवानगीशिवाय गावाच्या सीमेत कोणतीही नवी इमारत उभी करू शकत नाही, तसेच कोणत्याही इमारतीचे पुनर्बांधकामही करू शकत नाही.

* कोणतेही बांधकाम करण्याआधी परवानगी मागावी लागते, त्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागतो. काही कारणास्तव बांधकामास परवानगी नाकारण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे. इमारतीला परवानगी नाकारल्यास त्याची कारणे ग्रामपंचायतीला द्यावी लागतात. परवानगीसाठी केलेला अर्ज मिळाल्यापासून दोन महिन्यांच्या आत जर ग्रामपंचायतीने परवानगी दिली अथवा नाकारली असल्याबद्दल काही कळवले नाही, तर परवानगी देण्यात आली आहे, असे गृहीत धरण्यात येते. ग्रामपंचायतीने परवानगी नाकारली किंवा काही शर्तींवर परवानगी दिली, तर त्या विरोधात तो आदेश कळवल्याच्या दिवसापासून तीस दिवसांच्या कालावधीत स्थायी समितीकडे संबंधित व्यक्ती अपील करू शकते. ग्रामपंचायतीच्या पूर्वपरवानगीशिवाय एखाद्या व्यक्तीने गावात इमारत उभी केल्यास अथवा तिची पुनर्निर्मिती केल्यास त्या व्यक्तीला ग्रामपंचायत शिक्षा म्हणून दंड करू शकते.

* अवैध बांधकाम थांबवण्याचे आदेश ग्रामपंचायत संबंधित व्यक्तीला देऊ शकते. त्यासंदर्भात लेखी नोटीस देऊ शकते. इमारतीला आवश्‍यक वाटेल अशा ठिकाणी बदल करण्याचे वा ती पाडण्याचे आदेश ग्रामपंचायत देऊ शकते. ग्रामपंचायतीला हे सर्व अधिकार खासगी मालमत्तेच्या संदर्भातच दिलेले आहेत. एखादी इमारत किंवा वास्तू जर लोकसेवेसाठी किंवा सार्वजनिक हेतूने उभारण्यात येत असेल, तर आणि ती राज्य वा केंद्र सरकारच्या स्थानिक प्राधिकरणाची मालमत्ता असेल, तर त्या इमारतीला हे नियम लागू होत नाहीत किंवा अशा वास्तूंना ग्रामपंचायतीचे अधिकार लागू होत नाहीत; मात्र या इमारतींच्या उभारणी संदर्भातील नोटीस मात्र ग्रामपंचायतीला द्यावी लागते. तसेच त्या इमारतीबाबत किंवा जागेबाबत ग्रामपंचायतीचे काही आक्षेप वा सूचना असल्यास त्यांचा विचार करावा लागतो. तेवढा अधिकार नक्कीच ग्रामपंचायतीला दिलेला आहे.

* कोणत्याही इमारतीत कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल किंवा एखादी इमारत माणसांना राहण्यासाठी बांधलेली नसेल, तर ती इमारत माणसांनी राहण्यायोग्य करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला आहेत.

* ग्रामपंचायत इमारतीच्या जलनिस्सारणविषयक किंवा स्वच्छताविषयक व्यवस्थेत बदल होईल किंवा तिच्या सुरक्षेवर सुपरिणाम होईल, अशा पद्धतीने इमारतीत बदल करू शकते.

* धार्मिक पूजा-अर्चेची तसेच पवित्र इमारत नसलेल्या कोणत्याही जागेत ग्रामपंचायत संरचनात्मक बदल करू शकते.

* एखाद्या खुल्या जागेवर छप्पर किंवा आच्छादन घालून जी संरचना तयार होते, त्या संदर्भात भिंती व इमारती यांच्यामधील अशा जागेवर छप्पर किंवा आच्छादन घालण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला दिलेला आहे.

* गाळा, दुकान, वखार किंवा गोदाम म्हणून उपयोग करण्यासाठी बांधण्यात न आलेल्या कोणत्याही इमारतीचे अशा गाळ्यात, दुकानात, वखारीत किंवा गोदामात परिवर्तन करणे. आरंभी गाळा म्हणून बांधण्यात आलेल्या कोणत्याही इमारतीचे अशा गाळ्यात, वखारीत, गोदामात किंवा दुकानात परिवर्तन न करण्याचे कामही ग्रामपंचायत करू शकते. सार्वजनिक सडका किंवा खुली दुकाने यांच्यावरील अडथळे किंवा अतिक्रमणे यांच्या संदर्भातही ग्रामपंचायतीची काही कर्तव्ये आहेत.

गावाच्या सीमेतील कोणत्याही सार्वजनिक सडकेत, ठिकाणात किंवा उघड्या नाले-गटारांवर कोणतीही भिंत, कुंपण, कठडा, खांब, गाळा, व्हरांडा, ओटा, जोते, पायरी किंवा इतर कोणतेही अतिक्रमण करणारे बांधकाम केल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला आहेत. इमारतीच्या किंवा घराच्या मालकाला ग्रामपंचायतीने लेखी परवानगी दिल्याशिवाय त्याने घरात कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम केल्यास- व्हरांडा, खोली बांधल्यास त्याला ग्रामपंचायत शिक्षा करू शकते.

खासगी मालमत्ता नसलेल्या कोणत्याही गायरानात अनधिकृतरीत्या लागवड केल्यास वा त्याचा त्या पद्धतीने वापर केल्यास त्याला ग्रामपंचायत शिक्षा करू शकते. सार्वजनिक क्षेत्रात निर्माण झालेला कोणताही अडथळा किंवा अतिक्रमण काढून टाकण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला आहेत. ग्रामपंचायतीला बांधकामाच्या संदर्भात असे अनेक अधिकार दिलेले आहेत, त्यांचे पालन तिला करावे लागते.

0 comments: